आम्लपित्त म्हणजे काय ?

आम्लपित्त म्हणजे जठरात प्रमाणापेक्षा जास्त आम्ल तयार होणे. साधारणतः पचनसंस्थेत आम्लाची, अल्कलीची निर्मिती होत असते. आम्लाची निर्मिती झाल्यावर त्याच्या उदासिनीकरणासाठी त्याविरुद्ध अल्कलीचे प्रमाण वाढते. अल्कली निर्माण होण्यास गॅस्ट्रीन हे संप्रेरक कारणीभूत असते. अल्कलीचे प्रमाण वाढले की, व्हॅगस नावाच्या चेतातंतूद्वारे उद्दीपन होऊन आम्लाची निर्मिती होते व अल्कली उदासीन होतात. परंतु बऱ्याचवेळा उदासिनीकरणानंतरही आम्लाची निर्मिती होत राहते व जादा आम्ल तयार होण्याने तक्रारी सुरू होतात. यालाच आम्लपित्त होणे असे म्हणतात. या जास्तीच्या अाम्लामुळे पोटात / छातीत जळजळ, तोंडाला आंबट पाणी येणे व कधी कधी उलटी होणे, अशा तक्रारी सुरू होतात.
Image result for आम्लपित्त
आम्लपित्ताच्या तक्रारी पुढे अन्नमार्गात होणाऱ्या अल्सरमध्ये म्हणजे व्रणात रूपांतर होऊ शकते.

आम्लपित्त या आजाराचे प्रमाण खेडय़ांपेक्षा शहरी लोकांत जास्त आहे. कारण Hurry-Worry-Curry या गोष्टी शहरात राहणाऱ्या व्यक्तींच्या दैनंदिनीचा एक भाग झालेला असतो.

Hurry म्हणजे घाई. धावपळ, बस, लोकलच्या वेळा सांभाळणे, त्यासाठी घाईघाईने जेवणे, सर्व गोष्टी वेळांमध्ये बसवण्याची कसरत करत राहणे, जेवणाच्या वेळातील अनियमितता. Worry म्हणजे व्यवसायानुरूप येणाऱ्या, सामाजिक कारणांमुळे निर्माण होणाऱ्या चिंता; तसेच Curry म्हणजे मसालेदार पदार्थ ! खूप तिखट, तेलकट, आंबट पदार्थ वारंवार खाण्यामुळे; तसेच दारू, सिगारेट यांचे अतिसेवन यांमुळे जठरातील आम्लनिर्मिती प्रमाणापेक्षा अधिक होऊन आम्लपित्ताच्या तक्रारी सुरू होतात. आम्लपित्ताचा त्रास कमी करायचा असेल तर वरील सर्व गोष्टी टाळणे; दिनचर्या नियमित करणे; अनाठायी चिंता, बिडी, सिगारेट, दारू, तंबाखू यांचा अतिरेक न करणे; तिखट, मसालेदार, तेलकट पदार्थ कमी खाणे हे उपाय करायला हवेत.

आम्लपित्तावर अँटासिडच्या गोळ्या वापरतात. घरगुती उपायांमध्ये सोडा, लिंबू घेऊन हा त्रास कमी करता येतो. जेवणाच्या वेळा नियमित ठेवणे, जागरण टाळणे; आहारात ज्वारीची भाकरी, मुगाचे वरण, हिरव्या पालेभाज्या, ताक यांचा समावेश करणे; व्यसने टाळणे या उपायांनी आम्लपित्तावर नक्कीच मात करता येईल. आयुर्वेदात यासाठी खूप चांगले उपचार उपलब्ध आहेत. अर्थात औषधांपेक्षा जीवनशैलीतील बदल उपचारात महत्त्वाची भूमिका बजावतात, हे विसरता कामा नये. आम्लपित्ताला व त्यामुळे होणाऱ्या व्रणांना हेलिकोबॅक्टर पायलोरी हे जीवाणू जबाबदार असतात असे संशोधन करणाऱ्या डाॅ. मार्शल व डाॅ. वॉरेन या ऑस्ट्रेलियन संशोधकांना २००५ च्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. त्यामुळे आता या आजाराच्या उपचारात पुष्कळ बदल होणार आहेत !

Comments

Popular posts from this blog

गव्हांकुराच्या रसाचे फायदे (Wheat Grass)

आजार व त्यावरील उपाय

वडाच्या झाडाचे औषधी महत्व..!