डायलिसिस म्हणजे काय ?
मूत्रपिंडाच्या विकाराने पीडित रुग्णांच्या बाबतीत अमक्या अमक्या व्यक्तीस डायलिसिसवर ठेवले आहे, असे बोलणे आपण ऐकतो. डायलिसिस म्हणजे काय करत असतील, हे समजून घेण्यासाठी प्रथम आपल्याला मूत्रपिंडाचे कार्य काय आहे ते बघावे लागेल.
मूत्रपिंडाचे कार्य म्हणजे शरीरातील क्षार, पाणी यांचा समतोल कायम राखणे व शरीरात तयार होणार टाकाऊ पदार्थ, विषारी पदार्थ लघवीच्या माध्यमातून शरीराबाहेर टाकणे. सोडियम, क्लोराइड, पोटॅशियम, तसेच पाणी यांचे शरीरातील प्रमाण योग्य पातळीवर ठेवण्यासाठी मुत्रपिंड कार्यरत राहणे महत्त्वाचे असते. टाकाऊ पदार्थांमध्ये युरियाचा समावेश होतो.
सर्वसामान्यपणे आपल्या रक्तात १५ ते ४० मिलीग्रॅम प्रति १०० मिली इतका युरिया असतो. दोन्ही मुत्रपिंडे आजारामुळे वा इतर कोणत्याही कारणाने निकामी झाली तर युरियाचे रक्तातील प्रमाण वाढते. हे प्रमाण खूप वाढल्यास युरिया मेंदूत जमा होऊ लागतो. उपचार न केल्यास रुग्ण कोमात जाऊ शकतो व पुढे त्याचा मृत्यूही होऊ शकतो.
मूत्रपिंडाच्या कार्याला मानवाने शोधलेला पर्याय म्हणजे डायलिसिस. रक्तातील टाकाऊ पदार्थ काढून टाकण्यासाठी विशिष्ट द्रव वापरला जातो. डायलिसिसचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे पोटातील आवरणाच्या पोकळीत डायलिसिसचा द्रव २० मिनिटे ते १ तास ठेवतात.
या काळात पोटातील आवरणात रक्तातील टाकाऊ पदार्थ या द्रवात मिसळले जातात. नंतर हा द्रव काढून टाकला जातो. ही क्रिया ३० ते ४० वेळा केली जाते. या प्रक्रियेला पेरिटोनियल डायलिसिस म्हणतात. दुसऱ्या पद्धतीत शरीरातील रक्ताचे कृत्रिम किडनी म्हणजे यांत्रिक उपकरणाद्वारे शुद्धीकरण केले जाते. शुद्ध झालेले रक्त परत शरीरात सोडले जाते. याला हिमोडायलिसिस म्हणतात. डायलिसिसमुळे मुत्रपिंडाचे गंभीर रोग झालेल्या रुग्णांना जीवदान मिळाले आहे. मुत्रपिंडाचा विकार झालेल्या रुग्णांसाठी डायलिसिस हे वरदानच आहे.
Comments
Post a Comment