औषधी डाळींब


औषधी डाळींब | Medicinal Pomegranate

डाळींबाचा रस व खडीसाखर एकत्र करून घेतल्यास पित्त कमी होते. अपचन दूर होते आणि त्यामुळे निर्माण झालेला शौचाचा विकार बरा होतो.काविळीवरही हे एक चांगले औषध आहे. हृदयविकारामुळे छातीत दुखत असल्यास डाळींबाचा रस उपयोगी पडतो. डाळींबाचा रस, मध, साखर यांचे चाटण लहान मुलांचा खोकला बरे करते. फार बोलण्याने आवाज बसला असल्यास तो सुधारतो.

औषधी गुणधर्म –

पित्तशामक स्तंभक व कृमीनाशक आहे. तसेच त्रिदोषहारक, दाहशामक, तृष्णाशामक, बुद्धिवर्धक असतात.  स्निग्ध, रुची उत्पन्न करणारे, जठराग्नी प्रदीप्त करणारे असते. डाळिंबांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह हे क्षार असतात. तर प्रथिने, आद्र्रता, तंतूमय पदार्थ, पिष्टमय पदार्थ, क जीवनसत्त्व हेही घटक भरपूर प्रमाणात असतात. डाळींबाचे फळ, साल, पाने, फुले, बिया, मुळं या सर्वच भागांचा औषधामध्ये वापर करता येतो.
उपयोग –
* डाळींब हे पित्तशामक असल्याने गर्भवती स्त्रीस जर उलटी, मळमळीचा त्रास होत असेल तर डाळींबाचा रस दर दोन दोन तासांनी ३-४ चमचे पिण्यास द्यावा. यामुळे तोंडाला रुची उत्पन्न होऊन पाचक अग्नी प्रदीप्त होतो व भुकेची जाणीव निर्माण होते.
* अति ताप आल्यावर पथ्यकर आहार म्हणून डाळींब किंवा डाळींबाचा रस द्यावा. तापामुळे शरीरामध्ये वाढलेली उष्णता गोड डाळींबाने कमी होते व ताप नाहीसा होतो.
* चिरतारुण्य टिकवण्यासाठी रोज एक डाळींबाचे सेवन करावे.
* शरीर मजबूत, काटक व सुंदर बनविण्यासाठी डाळींब रस व आवळा रस एकत्र करून त्यामध्ये खडीसाखर घालावी व आठ दिवस उन्हात ठेवावे, तयार झालेले सरबत रोज १ कपभर प्यावे.
* अपचन, आम्लपित्त, ताप या कारणांनी जर तोंडास दरुगधी येत असेल तर डाळींबाचे दाणे चावून चावून खावे. यामुळे तोंड स्वच्छ होते व दरुगधी नाहीशी होते व तोंडाला रुची प्राप्त होते.
* घसा दुखणे, तोंड येणे हे आजार झाले असतील तर डाळींबाच्या सालीच्या काढय़ाने गुळण्या कराव्या.
* लाल रंगाचे दाणे असलेले गोड डाळींब हे रक्तवर्धक आणि शक्तिवर्धक असल्याने ज्यांना रक्ताची कमतरता (अ‍ॅनिमिया) आहे. त्यांनी रोज एक डाळींब सेवन करावे.
* अपचन, पोटात गॅस धरणे, शौचास साफ न होणे ही लक्षणे असतील तर रोज १ डाळींब खावे. यामुळे जाठराग्नी, प्रदीप्त होऊन अन्न पचते व बियांमधील चोथ्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते.
* डाळींबाची साल, फुले हे आतडय़ांमधील कृमींवर प्रभावशाली आहेत. पोटात होणारे चपटे कृमी, लांब जंत हे डाळींबांच्या सालीमध्ये असणाऱ्या अल्क गुणाने मरतात. याचा काढा सलग तीन दिवस १ ग्लासभर दिवसातून ३ वेळा द्यावा याने सर्व प्रकारचे जंतकृमी पडून जातात.
* स्त्रियांमध्ये होणाऱ्या श्वेत व रक्त प्रदरावर डाळींबाची साल गुणकारी ठरते. ही साल तांदळाच्या धुवणात वाटून द्यावी.
* डाळींबाचा रस अतिसार, मुरडा, संग्रहणी, आम्लपित्त, पांडुरोग (अ‍ॅनिमिया) जुनाट ताप, खोकला इ. आजारांवर गुणकारी आहे. 
* मूळव्याधीमध्ये जर रक्त पडत असेल तर डाळींबाच्या सालीचे चूर्ण नागकेशरमध्ये घालून द्यावे यामुळे रक्तपडण्याचे बंद होते तसेच अशक्तपणा आला असेल तर डाळींबाचा रस प्राशन करावा.
* बाराही महिने डाळींबाचे औषधी गुणधर्म उपयोगात आणण्यासाठी दाडीमावलेह, दाडीमादीघृत इ. डाळींबापासून बनवलेल्या औषधांचा वापर करावा.
* हृदय बळकट करण्यासाठी डाळींबाच्या रसात केशर, लाल गूळ व वेलची घालून त्याचे सरबत करावे व रोज थोडे थोडे प्यावे. यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यातील अडथळा दूर होऊन रक्ताभिसरण क्रिया सुधारते.
* डाळींबाच्या सालीचा तुकडा तोंडात ठेवून त्याचा रस चोखल्याने जुनाट खोकला नाहीसा होतो.
* डाळींबाचे दाणे वाटून त्याचा रस काढून जायफळ, सुंठ, लवंग पूड घालून त्यात मध घालावा व तयार झालेला रस २-२ चमचे तीन वेळा प्याल्यास पोटदुखी, आम्लपित्त, गॅस हे आजार कमी होतात.
सावधानता-
डाळींबामध्ये औषधी गुणधर्म खूप आहेत त्यामुळे कच्चे पिकलेले सर्व प्रकारचे डाळींब शरीराला उपयुक्त आहे. फक्तडाळींब खाण्यापूर्वी त्याची साल स्वच्छ धुऊन घ्यावी कारण कीड लागू नये म्हणून त्यावर कीटकनाशकांचा वापर केलेला असतो.
डाळींब सोलल्यानंतर त्याचे दाणे लगेचच खावेत. उशिरा खाल्यानंतर त्यातील पोषक घटकांचे प्रमाण कमी होते. त्याचप्रमाणे स्वाद व चवही कमी होते.

Comments

Popular posts from this blog

गव्हांकुराच्या रसाचे फायदे (Wheat Grass)

आजार व त्यावरील उपाय

वडाच्या झाडाचे औषधी महत्व..!