मणक्यांचे आजार : स्पाँडिलायटिस


मानदुखी
मानदुखीचा आजार भारतात खूप आढळतो. मानदुखी ही मुख्यत: मानेतील मणक्यांचा आजार आहे. मणके झिजून त्यातली कूर्चा-गादी दबणे,बारीक अस्थि-गुठळया तयार होणे, यामुळे आतील चेतारज्जू आणि बाहेर पडणा-या नसांना घर्षण व इजा होणे या सर्वांचा मिळून हा आजार होतो.

कारणे
मणक्यांची झीज होणे हा यातला मुख्य दोष आहे. मणक्यांची झीज जेवढी जास्त,तेवढी लक्षणे जास्त होतात. भारतात यासाठी काही विशेष कारणे आढळतात.
डोक्यावर सतत भार वाहणारे गट - हमाल, माथाडी कामगार, रस्त्यावर खडी-दगड वाहणारे मजूर, वर्षानुवर्षे डोक्यावर पाण्याचे हंडे वाहणा-या स्त्रियांना हा आजार लवकर गाठतो.
शिवाय वयोमानाप्रमाणे मणक्यांची झीज होतच असते.

लक्षणे
  • मानदुखी, मान जड होणे, मानेत कळा येणे, कवटीच्या तळाशी मानेत दुखणे.
  • पाठीच्या फ-यांमध्ये दुखणे (कण्याच्या दोन्ही बाजूला फ-याच्या पातळीत दुखणे)
  • खांद्याच्या भागात दुखणे.
  • डोकेदुखी - मागे सुरु होऊन डोक्याच्या वर पसरते.
  • चेतातंतूंवर दबाव आल्याने पुढील लक्षणे दिसतात: पाठीचा चौकोन, खांदा, दंडाचा पुढील भाग, मनगटाचा भाग, अंगठा, इ. ठिकाणी वेदना जाणवते. हे सर्व भाग मानेच्या मणक्यातून निघणा-या चेतातंतूंशी संबंधित आहेत. या भागातले स्नायू पुढे दुबळे होत जातात. चेतातंतू हाडांच्या-गुठळयांनी दाबले-रगडले जाणे हे त्याचे कारण आहे. काही जणांना मान पुढे वाकवल्यावर विजेचा झटका हातापर्यंत चमकतो.
  • याच भागात मुंग्या येतात. टोचल्याप्रमाणे संवेदना होतात.
  • कूर्चा चेतारज्जूवर दाबल्यामुळे विशिष्ट लक्षणे दिसतात. हाता-पायात दुबळेपणा जाणवतो, शक्ती कमी होते. लघवी, गुदद्वाराचे नियंत्रण कमी होते. अर्थातच हा आजार आता जास्त झालेला असतो.
  • मणक्याजवळच्या रक्तवाहिनीवर दाब आल्याने काही लक्षणे दिसतात. यात मुख्यत: चक्कर (मेंदूकडे रक्त कमी पडल्याने) हे लक्षण असते. चक्कर तात्पुरती किंवा सतत येते. चक्कर येण्याचे आणखी एक कारण म्हणजे मानेभोवतीच्या स्नायू व पडद्यांचा सतत ताण हे असते.

रोगनिदान
वरील लक्षणांवरून रोगाची शंका घेणे शक्य आहे. पुढील निदान व सल्ल्यासाठी डॉक्टरकडे पाठवावे. मानेचा क्ष किरण फोटो काढून आजाराचे प्रमाण निश्चित करता येते. आवश्यक वाटल्यास जास्त तपासण्या कराव्या लागतील. (उदा. सीटी स्कॅन किंवा एम.आर.आय. फोटो)

उपचार
सौम्य किंवा मध्यम आजार असल्यास साध्या उपायांनी याची लक्षणे कमी होतात. (पण मूळ आजार बरा होत नाही) यासाठी
  • मानेखाली कमी रुंदीची मऊ उशी घ्यावी. यामुळे मान नेहमीपेक्षा उलटबाजूला वाकून तिला विश्रांती मिळते.
  • पुढे वाकण्याचे, मान खाली करण्याचे प्रसंग टाळावेत. काम करताना मान ताठ किंवा मागे वाकलेली चांगली. यासाठी टेबलावर काम करताना उतरती फळी वापरावी. (पूर्वीचे दिवाणजींचे मेज चांगले)
  • मानेला हलका शेक, मसाज यांचा चांगला उपयोग होतो.
  • मानेचे व्यायाम करून स्नायू बळकट करणे आणि स्नायूबंध/पट्टे ढिले करण्याने वेदना कमी होत जाते.
  • वेदनेसाठी तात्पुरत्या वेदनाशामक गोळया घ्याव्यात.
  • प्रवासात मानेचा पट्टा वापरावा. यामुळे मानेला व मणक्यांना धक्के बसत नाहीत.
  • शरीरात 'गंजरोधक' पदार्थ (ऍंटी-ऑक्सिडंट) वाढण्यासाठी चांगला ताजा आहार घ्यावा. प्राणायाम करावा.
  • तीव्र आजार असल्यास (स्नायू दुबळे होणे, खूप वेदना, शॉक प्रमाणे चमकणे,लघवी-गुदद्वारावरचे नियंत्रण कमी होणे) यासाठी शस्त्रक्रिया लागू शकेल. या शस्त्रक्रियेच्या तंत्रात आता खूपच प्रगती झाली आहे. सूक्ष्म शस्त्रक्रियातंत्राने 'दुरुस्त्या' करण्यामुळे मोठी शस्त्रक्रिया टळते. याबद्दल अर्थातच तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.

Comments

Popular posts from this blog

गव्हांकुराच्या रसाचे फायदे (Wheat Grass)

आजार व त्यावरील उपाय

वडाच्या झाडाचे औषधी महत्व..!