आम्लपित्तावर आयुर्वेदिक उपाय (Hyper acidity)

हायपर अॅसिडीटी
Related imageआपल्या शरीरामध्ये श्वसनसंस्था, मज्जासंस्था, पचनसंस्था अशा विविध संस्था कार्यरत असतात. त्यातील पचनसंस्थेअंतर्गत येणारी आम्लपित्त ही व्याधी आहे. आयुर्वेदिय शास्त्रज्ञांनी त्याचं स्वतंत्र रोग म्हणूनही वर्णन केलेलं आहे. शरीरामधील पित्त या दोषाच्या विकृतीमुळे निर्माण होणारा हा रोग अनेक व्यक्तींना त्रस्त करून सोडतो. आजच्या धावपळीच्या युगामध्ये तर हा त्रास असणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. असं का घडतं, याची कारणमीमांसा नीट समजून घेतली पाहिजे. 

आम्लपित्ताची कारणे
अतिशय तिखट, मसालेदार, चमचमीत जेवण करणं, अतिशय आंबट खाणं, अतिप्रमाणात चहापान करणं, मोठय़ा प्रमाणावर केलेलं मद्यपान, तंबाखूच्या सेवनाचं वाढतं प्रमाण, मांसाहाराचं वाढत चाललेलं प्रमाण, अतिजागरण, जेवणाच्या वेळेत असणारा अनियमितपणा, भूक लागलेली असताना आहार न घेणं, मानसिक चिंता अशी कारणं सतत घडत गेल्यास व्यक्ती आम्लपित्ताकडे वाटचाल करू लागते.
इंग्रजीत यालाच 'हायपर अ‍ॅसिडीटी' असं म्हटलं जातं. आपल्या पचनसंस्थेत मुख, अन्ननलिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे इत्यादी अवयव आहेत. यापैकी जठराशी संबंधित असणारी आम्लपित्त ही व्याधी वेळीच लक्ष न दिल्यास गंभीर रूप धारण करू शकते.

आम्लपित्ताची लक्षणे
सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तीव्र वेदना डोकेदुखी, घशाशी होणारी जळजळ, तोंडाला आंबट, कडवट पाणी येणं, उलटीची भावना होणं ही आम्लपित्ताची सामान्य लक्षणं होत. काहीवेळा यामध्ये आंबट व करपट ढेकर येणं ही देखील तक्रार असते. या सर्व लक्षणांचा आयुर्वेदाने आपल्या ग्रंथांमध्ये बारकाईने उल्लेख केलेला आहे. 
आम्लपित्तामध्ये पित्तदोषाचा उष्ण गुण वाढतो, त्याच्या उष्ण गुणामुळेच छातीमध्ये जळजळ होत असते. या सर्व लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. दुर्लक्ष केल्यास पुढे जठराच्या ठिकाणी व्रण निर्माण होण्याची शक्यता असते. याला अल्सर असं म्हणतात. अल्सर हा अत्यंत तापदायक असा प्रकार आहे. म्हणून आम्लपित्ताकडे वेळीच लक्ष देणं आवश्यक आहे.

प्रतिबंधात्मक उपाय
वर सांगितलेली एकूण लक्षणं वाचल्यावर आम्लपित्त आपल्याला होऊच नये, असं सर्वाना वाटणं स्वाभाविक आहे. आपल्या सभोवताली आम्लपित्ताने त्रस्त रुग्ण अनेकांनी पाहिलेले असतील. त्यामुळेही आपल्याला यापासून मुक्तता हवी असंच मनापासून वाटत असेल, अशा सर्वानी आम्लपित्ताची वर सांगितलेली सर्व कारणं आपल्या बाबतीत घडणार नाहीत, याची जरूर काळजी घ्यावी. आपली दिनचर्या नियमित ठेवावी. आपला स्वभाव रागीट तसंच खूप चिंता करणारा असा असल्यास त्यावर नियंत्रण आणावे. व्यसनांपासून सदैव दूर राहावे.
ज्यांना आम्लपित्ताचा त्रास नेहमी होतो अशांनीदेखील वर सांगितलेल्या कारणांपैकी आपल्या बाबतीत कोणती कारणं घडताहेत याचा पडताळा घेऊन ती कारणे पुढे घडणार नाहीत, अशी व्यवस्था करावी. रोगाची कारणं शोधून ती टाळण्याचा प्रयत्न करणं हा प्रत्येक रोगाच्या उपचारामधील एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, असा आयुर्वेदाचा सिद्धांत आहे. म्हणून आयुर्वेदिय चिकित्सा पद्धतीमध्ये रोगाच्या कारणांना खूप महत्त्व आहे.

साजूक तुपाचा वापर हवा आम्लपित्ताच्या रुग्णांनी आपल्या जेवणामध्ये साजूक तुपाचा वापर भरपूर प्रमाणात करावा. तूप हे उत्तम पित्तनाशक असल्याने त्याचा या ठिकाणी चांगला उपयोग होतो. शतावरी, ज्येष्ठमध, दुर्वा या वनस्पती द्रव्यांचा वापर वैद्यांच्या सल्ल्याने केल्यास आम्लपित्तामध्ये लाभ होतो.

आयुर्वेदातील पंचकर्मापैकी वमन आणि विरेचन या दोन कर्माचा, आम्लपित्तामध्ये चांगला उपयोग होतो. आम्लपित्ताचा नेहमी त्रास असणा-यांनी मोरावळा खावा. आवळ्याच्या मोसमामध्ये आवळा आणि साखरेचा पाक यांचा उत्तम संयोग असलेला हा मोरावळा तयार करून ठेवावा. आवळा हा थंड गुणधर्माचा, पित्तशामक असल्याने त्याचा आम्लपित्तामध्ये उत्तम उपयोग होतो.

Comments

Popular posts from this blog

गव्हांकुराच्या रसाचे फायदे (Wheat Grass)

आजार व त्यावरील उपाय

वडाच्या झाडाचे औषधी महत्व..!